रातोरात उद्ध्वस्त झालं ‘या’ कलाकारांचं करिअर, छोटीशी चूक पडली महागात….

रातोरात उद्ध्वस्त झालं ‘या’ कलाकारांचं करिअर, छोटीशी चूक पडली महागात….

अभिनेत्री ममता कुलकर्णीपासून ते अभिनेता शायनी आहूजापर्यंत बॉलिवूडमध्ये काही असे कलाकार होते. ज्यांच्याकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. जेव्हा या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. पुढची काही वर्षं हे कलाकार रुपेरी पडदा गाजवतील असं वाटत असताना त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या.

ज्यामुळे त्यांचं आयुष्य तर बदललंच पण त्यासोबतच रातोरात त्यांची प्रसिद्धी आणि त्यांचं करिअरही उद्ध्वस्त झालं. यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी काही वर्षांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना फारसं यश मिळालं नाही. हे कलाकार नेमकी कोण आहेत यावर आज एक नजर टाकू.

शायनी अहूजा – अभिनेता शायनी अहूजानं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच्याकडून प्रेक्षकांसह निर्माते आणि दिग्दर्शकांच्याही अनेक अपेक्षा होत्या. त्याचा पहिला चित्रपट ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ बराच गाजला आणि त्याच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला. त्यानं ‘गँग्स्टर’, ‘वो लम्हे’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ यांसारख्या हिट चित्रपटात काम केलं. पण त्यानंतर शायनीच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आलं.

ज्याने रातोरात त्याचा स्टारडम आणि करिअर मातीमोल झालं. शायनी अहूजानं २००५ साली बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर २००९ साली त्याच्या कामवालीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. पोलिसांनी शायनी अहूजाला अटक केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०११ साली त्याला ७ वर्षांचा तुरुंगवास झाला आणि त्याचं करिअर संपुष्टात आलं.

मंदाकिनी – अभिनेत्री मंदाकिनीला आजही लोक ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे ओळखतात. १९८५ साली तिनं ‘मेरा साथी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. तिचा पहिला चित्रपट फारसा चालला नाही. मात्र ‘राम तेरी गंगा मैली’च्या रिलीजनंतर ती रातोरात स्टार झाली. या चित्रपटानंतर मंदाकिनीला एका मागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि तिनं अनेक हिट चित्रपटही दिले.

पण मंदाकिनीच्या करिअरला ब्रेक तेव्हा लागला जेव्हा तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं. दाऊद आणि मंदाकिनीच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. मंदाकिनीनं दाऊदसोबत कोणतेही संबंध किंवा अफेअर असल्याचं वृत्त फेटाळलं पण त्यावेळी समोर आलेल्या या दोघांच्या काही फोटोंनी मंदाकिनीच्या करिअरमध्ये वादळ आलं. मंदाकिनीला आपल्या चित्रपटात घेण्यास निर्मात्यांनी नकार दिला आणि मंदाकिनीला मिळणाऱ्या ऑफर कमी होत गेल्या. अखेर वेळ अशी आली की, तिच्याकडे कोणताच चित्रपट राहिला नाही तेव्हा १९९६ साली तिनं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.

फरदीन खान – अभिनेता फरदीन खानच्या बॉलिवूड पदार्पणानंतर त्याच्याकडूनही प्रेक्षकांना आणि बॉलिवूडलाही अनेक अपेक्षा होत्या. फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खाननं १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा अवॉर्डही मिळाला होता. त्यानंतर तो काही चित्रपटांमध्ये दिसला. मात्र २००१ साली त्याला कोकीन विकत घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्याचं करिअर संपलं. त्यानंतरही फरदीननं बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र ते शक्य झालं नाही. २०१० मध्ये अखेर त्यानं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला.

मोनिका बेदी – अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मोनिका बेदीचं करिअरही खूप उत्तम चाललं होतं. हिंदीसोबतच ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम करत होती. पण अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेमसोबत कनेक्शन आणि त्यानंतर झालेली अटक या दोन्ही गोष्टींनी तिच्या करिअरला ग्रहण लागलं. अबू सलेमशी नाव जोडलं गेलं आणि मोनिका बेदीचं करिअर काही काळातच संपुष्टात आलं. तिच्या आणि अबू सलेमची लव्हस्टोरी मात्र त्यावेळी बरीच चर्चेत राहिली होती.

ममता कुलकर्णी – मोनिका बेदीप्रमाणेच ९० च्या दशकातील स्टार अभिनेत्री ममता कुलकर्णीचं करिअर देखील अंडरवर्ल्ड कनेक्शनमळे संपलं. ९०च्या दशकात ममता कुलकर्णी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘बाजी’ आणि ‘चाइना गेट’ यांसारखे हिट चित्रपट दिले होते. पण एक छोटीशी चूक ममता कुलकर्णीला महागात पडली आणि तिचं करिअर मातीमोल झालं. ममता कुलकर्णीचं नाव गँगस्टर छोटा राजनशी जोडलं जाऊ लागलं. त्यानंतर २०१६ मध्ये कोट्यवधीच्या इफ्रेडिन ड्रग्स स्मगलिंग प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव समोर आलं होतं.

मनिषा कोइराला – सुभाष घई याचा चित्रपट ‘सौदागर’मधून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री मनिषा कोइरालाचं करिअर चांगलं चाललं होतं. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या आणि चित्रपट हिटही झाले होते. पण काही वर्षांत मनिषाच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्यानं तिचं करिअर संपून गेलं. मनिषाला दारुचं व्यसन लागलं होतं.

१९९९ साली लावारिस चित्रपटाच्या शूटिंगचं बिझी शेड्यूल आणि तणाव दूर करण्यासाठी मनिषानं दारुचा आधार घेणं सुरू केलं आणि तिला त्याचं व्यसन लागलं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावणं आणि बदललेला स्वभाव यामुळे तिला हातातले चित्रपट गमवावे लागले. २०१२ मध्ये तिला कर्करोगाचं निदान झालं. त्यातून ठीक झाल्यावर तिनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मात्र पूर्वीप्रमाणे प्रसिद्धी मिळू शकली नाही.

admin