सुंदर दिसत नाहीस तरी बुमराहला कसं पटवलं? विचारणाऱ्या ट्रोलरला संजना गणेशनचं उत्तर; म्हणाली, “तू स्वत: चप्पलेसारखा…”

सुंदर दिसत नाहीस तरी बुमराहला कसं पटवलं? विचारणाऱ्या ट्रोलरला संजना गणेशनचं उत्तर; म्हणाली, “तू स्वत: चप्पलेसारखा…”

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने पुन्हा एकदा तिला ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केली आहे. आपल्या इनस्टाग्राम पोस्टवर अगाऊपणा करणाऱ्या एका ट्रोलरला संजनाने जशास तसं उत्तर दिलं आहे. संजनाच्या या कमेंटची दखल तिच्या चाहत्यांनी घेतली असून सोशल मिडियावर तिच्या या कमेंटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

संजनाने ॲडलेडच्या मैदानात काढलेला स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. समाचलोक असणारी संजना सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मिडीया टीमची सदस्य आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान गुरुवारी होणाऱ्या ॲडलेडमधील सामन्याच्या पार्श्वभूमीवर ती नुकतीच ॲडलेड दाखल झाली. त्यानंतरच तिने हा फोटो पोस्ट केला होत्या जो आता या कमेंटमुळे चर्चेत आहे.

या फोटोला संजनाने, “ॲडलेडमधलं वातावरण सध्याच्या क्षणाला फार सुंदर आहे,” अशी कॅप्शन दिली होती. मात्र एका ट्रोलरलने या सुंदर फोटोवरुन संजनाला लक्ष्य करत एक वाईट कमेंट लिहिली. “मॅडम तुम्ही एवढ्या सुंदर दिसत नाही तरी बुमराहला कसं पटवलं?” अशी कमेंट या ट्रोलरने केली होती. पती जसप्रीत ज्याप्रमाणे भन्नाट यॉर्कर टाकतो तसेच शाब्दिक यॉर्कर टाकण्यात पटाईत असलेल्या संजनाने या ट्रोलरचा जशास तसं उत्तर देत त्याची विकेट काढली.

संजनाने या ट्रोलरच्या कमेंटला रिप्लाय देताना, “…आणि तू स्वत: चप्पलेसारखा चेहरा घेऊन फिरतोय त्याचं काय?” असा प्रश्न ट्रोलरला विचारला. या संवादाचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल झाले आहेत. संजनाने अशाप्रकारे ट्रोलरला उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीही तिने असाच एक भन्नाट रिप्लाय एका ट्रोलरला दिला होता.

बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघातून बाहेर असतानाच भारत आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी संजनाने एक पिकनिकचा जुना फोटो पोस्ट केला होता. त्यावर एकाने भारताला गरज असताना तुझा पती संघात नव्हता आणि आता तुम्ही फिरताय अशा पद्धतीची कमेंट केली होती. या कमेंटला रिप्लाय करताना संजानाने, “थ्रोबॅक (जुना) फोटो आहे, दिसत नाही का चोमू माणसा” अशी प्रतिक्रिया नोंदवली होती.

admin